बुधवार, १९ जुलै, २०१७




               आम्ही आकाश बघू.......





                                                                                                        

                                  आम्ही झाडं बघू.....

                                                                                                                   


आम्ही पक्षी बघू....... 

           

  आम्ही पाउस बघू ....... 



    




आम्ही आकाश बघू ....              




                       

                                                   

   हे रंग, हे गंध, हे स्पर्श, आनंद

                                                       

                     

                                                       ज्यांनी दिले आम्ही त्यांना स्मरू.... 





     


आम्ही आकाश बघू...

                                                                       


तो देतो अन,

                      देतच राहतो....  

                                                 देणारा तो आमचा गुरु.... 



                                                                             












  • जीवांची विविधता अर्थातच.. आपलीही..... 



मी भटकतो. भटकंती करता करता मला आयुष्य काढता आलं तर मी ते करायला तयार आहे इतकं माझं भटकंती वर प्रेम आहे. रस्ते,रूळ,हवा ( आकाश ), पाणी, डोंगर कुठलाही प्रवास मला वेडावतो. प्रवासाच्या कुठल्याही साधनातली कुठलीही गैरसोय आजकाल मला फारच कमी महत्वाची वाटू लागली आहे. आपली सर्वच प्रकारची विविधता मला आकर्षित करते. माणसांमधली अनेक कारणांनी येणारी विविधता फार आकर्षक!!!! उत्सुकता वाढवणारी आणि काही वेळा उत्सुकता ताणणारी तर क्वचित उत्सुकता संपवणारी सुद्धा. निसर्गातल्या विविधतेबद्दल तर न संपणारं बोलणं बोलत राहावं लागेल इतकी ती अफाट आहे. काहीवेळा वर्णनाच्या, व्यक्त करण्याच्या सर्व माध्यमांच्या पलीकडे आहे असं माझं आकलन आहे.

पण.. माणूस आणि निसर्ग, माणसाला उमगणारा निसर्ग, माणसाचं निसर्गासकट, निसर्गाला त्रास देत, ओरबाडून घेत जगण. निसर्गाला आपल्यात शोधत जगण हे आणि ह्याचे वेगवेगळे पैलू समजून घेण्यासाठी भटकंती गरजेची आहे असं मला काही काळापासून वाटू लागलं आहे. म्हणूनही मी भटकतो. आत्ता आपल्या आजूबाजूला असलेला 'निसर्ग' हा आपण ज्या पर्यावरणासकट स्वीकारला आहे, नाकारला आहे; स्वतःच्या सुखी-समृद्ध आयुष्याच्या कल्पनांनुसार, त्या बद्दलची ही निरीक्षणे करायचा नाद मला लागला आहे. म्हणूनही भटकंती. 'गोरेगांव' च्या तीन खोल्यांत बसून ही, इतरांनी केलेल्या लेखनाच्या आधारानं, चिंतन मनन करत हा विचार करता येईल असं एक मत असूच शकतं. मी तो मार्ग स्वीकारलेला नाही इतकंच. शिवाय, निसर्गातले सगळे घटक नव्यानं समजून घेण्याचा एक मुलभूत दृष्टीकोन मला एका अभ्यास क्रमानं देऊ केला; नुकताच... वर्षभरात. तर त्यामुळे, निसर्ग वाचण्याची सवय लागते आहे. माझं मला जसं वाचता येऊ लागलं तेव्हा जसा हावरटपणे मी समोर येईल त्याचा फडशा पाडत होतो तसंच ह्या 'निसर्ग वाचना' बाबतीत झालंय. त्यासाठी भटकंती शिवाय काही पर्याय आहे म्हणता? मला तरी अजून दिसलेला नाही. शिवाय जे काम मला नेमून दिलं जातं-दुसऱ्याच कुणाकडून; त्याला फाटा देऊन,तिथून पलायन करायला मला आवडतं. हे शेवटचं आणि फारसं तथ्य नसलेलं कारण. अशा अनेक कारणांमुळे मी बाहेर पडतो. घराच्या,शहराच्या,माणसांच्या मधून बाहेर पडून... नवी माणसं, नवी गावं, नवी शहरं, नवी घरं निरखायला,अनुभवायला. त्या भटकंती मध्ये नेमकं काय काय होतं, काय पाह्यलं जातं, काय अनुभवलं जातं हे टिपून ठेवावं असं वाटलं. त्या पैकी माझ्यात जतन काय होतं ते तपासून पाहण्यासाठी हा लेखन प्रपंच. आणि बाकी, मी अमुक ठमूक पाहून/करून आलो हे जगाला सांगून लक्ष माझ्याकडे वेधून घेणे, स्वतःचं कौतुक करून घेणे, स्वतःला इतरांपेक्षा वेगळं समजण्याचा अट्टाहास पूर्ण करून घेणे हे सगळे छुपे हेतू आहेतच. "जसं मला दिसतं!!!" तसं जग इतरांना दाखवण्याचा एक प्रयत्न.


यात फोटोग्राफ्स असतील, शब्द असतील आणि क्वचित कधी व्हिडीओ सुद्धा. तीनही माध्यमांचं मिश्रण. भटकंतीची गोष्ट सांगताना जे जे जेव्हा केव्हा आवश्यक वाटेल ते तेव्हा. कधी लिहायचा कंटाळा आला तर मीच माझं चित्रीकरण करून घेऊन त्यात जे वाटतंय ते बोलेन अशीही एक शक्यता आहे. आणखी एक, मी काही एकामागोमाग एक सहली करत नाही...भटकंतीच्याही लहरी असतात. त्या लहरीमुळे मी बाहेर पडतो. त्यामुळे ह्या लेखनात सातत्य असेलच किवा ठराविक अंतरानं स्तंभ लेखन केल्यासारखं मी लिहीनच असं नाही. हे जे काही लिहीन त्यात माझी निरीक्षणे, माझी मतं, माझे दृष्टीकोण आणि किंचित माहिती असं सगळं असेल. तुम्ही मला हे वाचून, सुचना करू शकता, माझ्यावर ताशेरे ओढू शकता, मला आरसा दाखवू शकता, नवी ठिकाणं सुचवू शकता, माझ्यासोबत भटकण्याचा विचार बोलून दाखवू शकता. आणि कौतुक तर मला नेहेमीच हवंय.😍😄




त्यामुळे आता सुरु करुया. माझा पहिला वाहिला 'लेखन कट्टा'




 "जसं मला दिसतं!!!"😎

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

               आम्ही आकाश बघू.......                                                                                     ...